
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विरोधी पक्षाशिवाय लोकशाही असूच शकत नाही, असे सांगतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या पक्षाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेवरून पलटी मारली. त्यासाठी भाजपच्या त्या घोषणेचा नवा अर्थ सांगताना ते म्हणाले की, ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस संस्कृतीपासून मुक्तता. त्या पक्षापासून नव्हे!
छत्तीसगडचा दोन दिवसांचा दौरा आटोपून दिल्लीला निघण्याआधी शहा यांनी अंबिकापूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात ‘भाजप हा विरोधी पक्षांचा देशातून सफाया करू इच्छितो काय’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भाजप अध्यक्षांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ या पक्षाच्या नाऱयाचा वेगळाच अर्थ सांगितला.
विरोधी पक्ष हा लोकशाहीत महात्त्वाचा आणि अविभाज्य घटक असतो, असे सांगून शहा पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष स्वतःच लयाला जात आहे. तो पक्ष जिवंत ठेवण्याची जबाबदारी राहुल गांधी यांची आहे. माझी नाही.
सध्याचे काँग्रेस अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी त्या पक्षाची कामगिरी सांगितली पाहिजे. भाजपची कामगिरी अध्यक्ष या नात्याने मलाच सांगावी लागेल. लोकशाहीत हे घडले पाहिजे. त्याला कोणाची हरकत असता कामा नये.
– अमित शहा, अध्यक्ष, भाजप



























































