महाभारतकालीन वारसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमिता वारणकर,[email protected]

उत्तर प्रदेशातील सिनौली गावात नुकताच चार हजार वर्षांपूर्वीच्या महाभारतकालीन वस्तू सापडल्या आहेत…

विविध धर्म, भाषा, परंपरा, चालीरीती यांनी नटलेली प्राचीन हिंदुस्थानी संस्कृती… समृद्ध आणि वैविध्यपूर्ण… संगीत, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला अशा विविधांगी कलांनी आपले परंपरागत प्राचीनत्व टिकून  आहे… वैविध्यपूर्ण चालीरीती, वातावरण, भौगोलिक रचना, वैशिष्टय़पूर्ण आकृतीबंधांनी कोरलेल्या… कलाकुसर केलेल्या वस्तू, शस्त्रास्त्र,  असा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आपण जपतो… पुरातन वारशाचा हा शोध आजही सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील बाघपतमधल्या सिनौली या गावात काही दिवसांपूर्वी केलेल्या उत्खननातून पुरातत्व खात्याला चार हजार वर्षांपूर्वीच्या वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये रथ, तलवारी, शिरस्त्राण, खंजीरासारखी शस्त्र यांचा शोध लागला. तसेच आठ शव पुरण्याच्या जागा, पानाफुलांची नक्षी असलेल्या शवपेटिका,  मोठय़ा तलवारी, कलाकुसर केलेले कंगवे, शव पुरलेल्या जागी रथ अशा अनेक गोष्टी शोधण्यात उत्खनन विभागाला यश आलेले आहे. प्राचीन संस्कृती, तेथील नागरीकरण याबाबत पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. तेजस गर्गे सांगतात, २००४-२००५ साली येथे आढळलेल्या काही अवशेषांमुळे हे खोदकाम करण्यात आले होते. तेव्हा रथ, दागिने, सोन्याच्या काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या.  यामुळे कुतूहलापोटी येथे आणखी उत्खनन करण्यास सुरुवात केली. तेव्हा तांब्याचे आरसे, मातीची भांडी, विशेषतः तांबे आणि कास्य धातूपासून बनवलेली शस्त्र, ढाली, शिरस्त्राण अशा अनेक वस्तू सापडल्या. रथ आणि शस्त्रास्त्रामुळे तेथील समाज युद्ध करणारा होता, हे सिद्ध होते. आतापर्यंत सापडलेल्या वस्तूंवरून आणखी नवे शोध लागण्याची शक्यता आहे.

ज्या परिसरात काही मानवी अवशेष किंवा वैशिष्टय़पूर्ण वस्तू आढळतात, अशा ठिकाणी पुरातत्व विभागातर्फे जमिनीखालील खोदकामाला सुरुवात होते. ऐतिहासिक वारसा जपावा, त्याचा शोध लागावा आणि नवीन पिढीलाही आपल्या हिंदू संस्कृतीचं महत्त्व या शोधाच्या माध्यमातून कळावं, हा यामागचा हेतू असतो. या उत्खननादरम्यान जीपीएस प्रणाली, सॅटलाइट अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही उत्खनन प्रक्रिया करतो, अशी माहिती ते देतात.

वस्तूंचा काळ ठरवण्याविषयी त्यांचे म्हणणे आहे की, आजही अनेक ठिकाणी केलेल्या उत्खननातून सापडलेल्या वस्तूंमध्ये प्राचीन संस्कृती आणि नागरीकरण यांचा मिलाफ आढळतो. याविषयी त्यांचे म्हणणे आहे की, आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वीपासून मोठय़ा प्रमाणात  नागरी वस्ती अस्तित्वात होती. म्हणून त्यांनी जपलेली संस्कृती, कला, तांबे, कास्य, सोने या धातूंपासून बनवलेल्या वस्तू, मृत पशु-जिवांचे अवशेष उत्खननात सापडतात. वस्तूंवरील मोराचं चिन्ह, पानाफुलांची नक्षी, वैविध्यपूर्ण आकृत्या याचा अभ्यास करून त्यांचा काळ ठरवला जातो. सिनौली गावातील उत्खननात सापडलेले राजघराण्यातील सुंदर रथ, शस्त्र तलवारी, ढाली या पुराव्यांवरून त्या योद्धा समाजातील आहेत याचा शोध लागला. अशाच पद्धतीने उत्खननावेळी सापडलेल्या  अवशेषांवरून त्यांचा काळ ठरवला जातो.

ऐतिहासिक वैभवाचे जतन

सिनौली तसेच इतरही ठिकाणी केलेल्या खोदकामातून सापडलेल्या पुरातन वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्या प्रदीर्घ काळ टिकण्यासाठी त्यावर प्रयोग केले जातात. त्यानंतरच  प्रदर्शनासाठी आणि पुरातत्व विभागात ठेवल्या जातात. हडप्पा, मोहेंजोदरो येथील अवशेष, शिवकालीन नाणी, शस्त्र हे आपल्या देशाला लाभलेलं ऐतिहासिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांचं जतन होणं आवश्यक आहे. यासाठी पुरातत्व विभागाचे प्रयत्न असतात.

नागरिकांना आवाहन

प्राचीन जीवनशैलीचा उलगडा करणाऱया वारशाच्या शोधाचे मोल नागरिकांनीही जाणायला हवे. काही लोकांना या खोदकामातील शोधाबाबत काहीही वाटत नाही. अशी उदासीनता न बाळगता या विषयात रुची घेऊन     उत्खननातून सापडलेल्या वस्तूंच्या संग्रहालयाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन डॉ. गर्गे करतात.