
सामना ऑनलाईन, नगर
सरकारी अधिकारी, कर्मचारी हे नागरिकांची कामे करून देण्यासाठी पैशाच्या, भेटवस्तू या स्वरूपात लाच मागतात. परंतु, महसूल विभागाच्या एका मंडल अधिकार्याने पैशाबरोबरच दोन किलो मटन बिर्याणी लाचेच्या स्वरूपात मागितली. या मंडल अधिकार्याला एसीबीच्या पथकाने लाच घेताना पकडले. कोपरगाव तालुक्यातील सुरेगावचा मंडल अधिकारी उल्हास यशवंत कवडे (वय ५७, कोपरगाव) असं या हावरट अधिकाऱ्याचं नाव आहे.
कवडे विरोधात कोपरगावमधील एका नागरिकाने एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारदाराने आई, भाऊ व स्वतःच्या नावाने प्लॉट खरेदी केला होता. या खरेदी खताची नोंदणी करण्यासाठी व सात-बारा उतार्यावर नावे लावण्यासाठी मंडल अधिकारी कवडे याने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने एक हजार रुपये मंडळ अधिकार्याला दिले होते. सात-बारा उतारा घेण्यासाठी तक्रारदार हे कवडे याला भेटल्यानंतर त्याने उर्वरित लाचेची १४ हजार रुपयांची रक्कम व २ किलो मटन बिर्याणीची मागणी केली केली. ही रक्कम व बिर्याणी माहेगाव देशमुख येथील तलाठी कार्यालयात देण्याचे ठरले होते. बिर्याणी खायची स्वप्न रंगवत असलेल्या कवडेला १४ हजारांची लाच घेताना तलाठी कार्यालयातच अटक केली.






























































