
सामना प्रतिनिधी, हडोळती
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या मौजे बोडखा येथील ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. शाळेतील सहशिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी करीत शाळा बंद केली गेली.
मौजे बोडखा येथे सहशिक्षक एस. यू. कासले यांची बदली करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये कासले यांची बदली झाली. बोडका येथील शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतलेली होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावामध्ये शैक्षणिक जागृतीचे काम त्यांनी केले असून त्यामुळे इतर शिक्षणासाठी जाणारा लोंढा थांबला. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्याही वाढली. लोकवाटा तसेच स्वखर्चातून त्यांनी शाळेली रंगरंगोटी केली. डिजीटल शाळा करण्याचे काम या काळात झाले. शाळेचा कायापालट झाला तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली.
शिक्षकाची बदली झाल्याचे समजल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी थेट शाळेला कुलूप ठोकले. त्यांची बदली रद्द करण्यात यावी आणि त्यांना याच शाळेवर पदस्थापना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत असताना बोडखा येथे मात्र थेट पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.

























































