निरोप असावा तर असा, शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावर बसून ऑफिसमध्ये एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

ऑफिसमधला शेवटचा दिवस सर्वांच्या लक्षात रहावा ही प्रत्येकाची इच्छा असते. बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही हटके अंदाजात ऑफिसला हजेरी लावली आणि तो दिवस अविस्मरणीय केला. रुपेश कुमार वर्मा नावाचा हा इंजिनिअर शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरून ऑफिसला आला. इंजिनिअरने घोड्यावर बसून ऑफिसमध्ये केलेली एन्ट्री सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रूपेश वर्मा बंगळुरूमधील ‘एम्बसी गोल्फ रिंग’ या कंपनीमध्ये नोकरी करत होता. ऑफिसच्या शेवटच्या दिवशी रूपेश घोड्यावरून ऑफिसला आला. त्याने घोड्यावर ऑफिसचा शेवटचा दिवस अशी पाटीही लावली होती. रुपेश सकाळी ७ वाजता घरातून ऑफिसला जायला निघाला होता. मात्र शहरातील वाहतूक कोंडी आणि घोड्यानं अधूनमधून घेतलेली विश्रांती यामुळे तो दुपारी २ वाजता ऑफिसला पोहोचला.

रुपेश कुमार वर्माचे घोड्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्याशी संवाद साधला असत नोकरीचा कंटाळा आल्यानं आपण राजीनामा दिल्याचे त्याने सांगितले. ‘सॉफ्टवेअर अभियंते म्हणून आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करतो. सॉफ्टवेअरशी संबंधित जटिल समस्या सोडवतो. मग हेच काम आम्ही स्वत:च्या देशासाठी का करू शकत नाही? देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यानं मी नोकरी सोडली. आता स्वत:चं स्टार्टअप सुरू करण्याचा माझा विचार आहे,’ असं रुपेशनं सांगितलं.