
सामना प्रतिनिधी। वडवणी
वडवणी येथे जीवलग मित्राच्या लग्नाच्या मिरवणूकीत नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बालाजी दत्तात्रय पंधारे ( ३०) असे या तरुणाचे नाव आहे. बालाजीच्या अकस्मिक मृत्यूने गावावरच शोककळा पसरली आहे.
बालाजी हा हॉटेल व्यावसायिक होता. वडवणी येथे त्याचे छोटेखानी हॉटेल आहे. सोमवारी त्याच्या जीवलग मित्राचे लग्न असल्याने बालाजी खूप आनंदात होता. नवरदेवाची मिरवणूक सुरू असताना बालाजी व इतर मित्र बेफाम नाचत होते. त्याचवेळी अचानक बालाजीच्या छातीत दुखू लागले. यामुळे मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. बालाजीच्या अकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
























































