
सामना प्रतिनिधी । पारनेर
पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यात एका तरूणासह ३ गायीं व वासरू जखमी झाले आहे. तालुक्यातील ढवळपूरीच्या सुतारवाडीमध्ये बुधवारी पहाटे ही घटना घडली.
सुतारवाडी येथील रामभाउ शंकर सांगळे यांच्या गोठयामध्ये बुधवारी पहाटे गायींच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने रामभऊ सांगळे हे जागे झाले. गोठयाजवळ जाऊन त्यांनी पाहिले असता पिसाळलेला लांडगा गोठयात बांधलेल्या गायी तसेच वासरास चावा घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जनावरांना लांडग्याच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी रामभाऊ सांगळे हे त्यास काठीने मारून पिटाळून लावण्याचा प्रयत्न करू लागताच लांडगा सांगळे यांच्या अंगावर धावून आला. त्यांच्या आरडा-ओरड्याने घरातील सदस्य जागे होऊन रामभाऊ यांचा मुलगा बाबाजी हा त्यांच्या मदतीस धावून आला. गायी व वासरांची सुटका करण्यासाठी बाबाजी याने गोठ्यात जाऊन लांडग्यास हाकलण्याचा प्रयत्न करताच लांडग्याने बाबाजी यांच्या अंगावर झेप घेऊन त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर लांडगा तेथून पसार झाला.
घटनेनंतर बाबाजी यास भाळवणी येथील खाजगी रूग्णातयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू लांडगा पिसाळलेला असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी बाबाजी यास नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी गायींवर पशुवैद्याकिय अधिका-यांनी या घटनेची माहीती मिळाल्यानंतर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी मनिषा भिंगे यांच्याशी संपर्क करून लांडग्याने केलेल्या हल्ल्याचा पंचनामा करून सबंधीतांना भरपाई देण्यासंदर्भात सुचना दिल्या.



























































