
सामना प्रतिनिधी । राजगुरूनगर
भूल न देता टाके घालताना वेदनेने तडफडणाऱ्या रुग्णालाच डॉक्टरांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात घडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अपघातग्रस्त तरुणाच्या नातेवाईकांनी चांडोली येथे रुग्णालयात जाऊन याचा जाब विचारत राजगुरूनगर पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरच्या विरोधात तक्रार दिली आहे.
पापळवाडी येथे गेल्या आठवड्यात संपत गणपत पापळ (वय ३६) यांचा अपघात झाला होता. डोक्याला मोठी जखम झाल्याने उपचारासाठी मित्रांच्या मदतीने त्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. राहुल तायडे यांनी भूल न देता डोक्याला पडलेल्या खोल जखमेवर टाके घालत होते. त्यामुळे संपत वेदनेने तडफडत होता. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. उलट संपतलाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. संपतचा मावसभाऊ विशाल डांगले याने याचा व्हिडीओ काढला होता. डॉ. तायडे यांनी संपत यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया करत चार टाके घातले. मात्र, आतमध्ये खडे, माती जसेच्या तसेच होते. हे पिंपरी -चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात गेल्यावर लक्षात आले.
धक्कादायक बाब म्हणजे चांडोलीत उपचारादरम्यान चार टाके घातले होते. मात्र, वायसीएममध्ये संपत यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करत २२ टाके घातले. संपतची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जखमींचे नातेवाईक व मित्रांनी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांची भेट घेऊन डॉक्टर राहुल तायडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी संबंधित डॉक्टरने केलेले कृत्य निंदनीय असून, त्यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक अरिंवद चौधरी यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
रुग्णालयातील पहिल्याच दिवशीचे ‘प्रताप’
एरव्ही अपघात असो की इतर आजार, रुग्णांसाठी देवदूतासारखे धावून येणारे डॉक्टर आपण पाहतो. मात्र, अपघातात जखमी व्यक्तीला उपचारादरम्यान मारहाण करणारे डॉक्टरही असल्याचा अनुभव या घटनेवरून आला आहे. विशेष म्हणजे डॉ. राहुल तायडे यांचा रुग्णालयात हजर होण्याचा पहिलाच दिवस असल्याचे समजते.






























































