आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

शेती उत्पादनाचे अत्यल्प दर त्यामुळे होणारी आर्थिक ओढातान अशा कारणामुळे कुटुंबासमोर निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमुळे उद्दिग्न झालेल्या एका शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर येथे घडली आहे. अलिशा हणमंत लवटे असं १७ वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती तासगाव येथील इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती.

अलिशाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आई वडिलांना दोन भावंडांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही त्यांची आर्थिक ओढाताण होते. तसेच माझे शिक्षण थांबले तर बहीण भावाचे शिक्षण पूर्ण होईल म्हणून मी माझे जीवन संपवीत असल्याचा हृदयद्रावक मजकूर लिहिला आहे.

अलिशाची मोठी बहीण देखील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर लहान भाऊ दहावीमध्ये शिकत आहे. तसेच अलिशाचे वडील शेती करतात तर आई अंगणवाडी शिक्षिका आहे. या कुटूंबाची एक एकर शेती असल्याने या शेतीवर कुटूंबाचा चरितार्थ आणि शिक्षणावर होणारा खर्च भागवताना वडिलांची तारेवरची कसरत होते. त्यामुळे आलिशाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अलिशाच्या या अनपेक्षित कृतीमुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.