
सुधीर नागापुरे, माजलगाव
ईद निमित्त नातेवाईवाईकांना भेटण्यासाठी कोल्हापूर येथून आलेल्या शेख बादशहा शे. वजीर व आयुब काझी यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नवीन बाजार समिती आवारासमोर घडली असून अज्ञात वाहनांचा अद्यापही तपास लागलेला नाही.
माजलगाव येथून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले असून त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. महामार्ग ६१ वर तर सुसाट वेगाने वाहने सुरू असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील काडगाव येथील शेख बादशहा शे.वजीर ४५ वर्ष हा माजलगाव तालुका हद्दीपलीकडील गोळेगाव जि. जालना येथे ईद निमित्त भेटण्यासाठी बसने रविवारी सकाळी माजलगाव येथे आले. त्यांना गोळेगाव येथे नेण्यासाठी आयुब काझी हा बजाज मोटरसायकल एम एच२१-८८७६ घेऊन आला होता. दोघे जण या गादीवर बसून माजलगाव शहरातून निघाले असता नवीन बाजार समिती आवारासमोर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघांच्याही डोक्याला जबरदस्त दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन पसार झाले, त्यामुळे त्याचा मागमूस लागला नाही. घटनेनंतर शहर पोलीस व नातेवाईक यांनी ठाण्यात गर्दी केली होती. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.






























































