
सामना प्रतिनिधी । मुंबई
अगोदर कोणाला ड्रॉप करायचे यावरून चालक आणि महिला प्रवाशाचा वाद सुरू असताना त्यांच्यामध्ये अन्य प्रवासी महिला समजावण्यासाठी मध्यस्थ आली. पण वाद घालणाऱया महिलेने दुसऱ्या प्रवासी महिलेला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना लोअर परळ येथे घडली. रेश्मा पॉल (३०, नाव बदललेले) हिने शेअरिंग उबेर कार बुक केली होती. मात्र त्या कारने आधीच एक महिला प्रवास करीत होती. मी आधी कार बुक केलेली असल्याने पहिल्यांदा मला इच्छित स्थळी सोडावे असे ती महिला चालकाला बोलू लागली. त्यावरून ती महिला आणि चालकामध्ये वाद सुरू असताना रेश्मा हिने मध्यस्थी करत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सहप्रवासी महिलेने रेश्माला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यामुळे रेश्मा हिने दिलेल्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्या महिलेविरोधात अदखलपात्र गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.






























































