अकरा महिन्यांच्या चिमुरडीच्या पोटात अडकलेली सेफ्टीपीन विनाशस्त्रक्रिया बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

एका अकरा महिन्याच्या चिमुरडीच्या पोटात अडकलेली सेफ्टीपीन येथील सुप्रसिध्द डॉ.नितीन जोशी यांनी शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या सहाय्याने अलगद बाहेर काढली आणि मुलीच्या आई-वडिलांना मोठा दिलासा दिला.

उदगीर तालुक्यातील शेल्लाळ या गावातील श्रावणी किरण मोरे नावाच्या अकरा महिन्यांच्या चिमुकलीच्या हाती दोन सेफ्टीपीन लागल्या. आई इतरत्र काम करण्यासाठी घरात गेली असतांना या दोन्ही पीन श्रावणीने तोंडात घातल्या. आईच्या नंतर ते लक्षात आले. तोपर्यंत या दोन्ही पीन तिने गिळल्या होत्या. दुसऱ्या दिवशी एक पीन शौचाव्दारे बाहेर पडली, मात्र एक पीन आतड्यामध्ये रुतून बसली. गेल्या अकरा दिवसापासून शहरातल्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे तिच्या पालकांनी उपचार घेतले.

एका डॉक्टर महाशयाने तर सदर मुलीचे सिटीस्कॅन केले. वयाच्या पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांची सीटी स्कॅन टाळणे खरे तर आवश्यक होते.तरीही या मुलीचे सीटी स्कॅन झाले आणि तिच्या ऑपरेशनसाठी पन्नास हजार रुपये लागतील, असेही एका डॉक्टर महाशयांनी सांगितले. मात्र मोरे कुटुंबियांना इतक्या छोट्या वयात मुलीचे ऑपरेशन करणे योग्य नाही असे वाटल्याने त्यांनी अन्य मंडळींचा सल्ला घेतला. काही मंडळींनी त्यांना डॉ.नितीन जोशींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सोमवारी मोरे कुटुंबिय डॉ.जोशींकडे आले आणि त्यांनी आपली सर्व हकिकत सांगितली.

यावेळी डॉ.नितीन जोशी यांनी कुठल्याही वैद्यकीय चाचण्या न करता भूलतज्ज्ञाला बोलावून तिच्यावर उपचार सुरु केले. यावेळी कुठलीही शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या माध्यमातून श्रावणीच्या पोटात गेलेली पीन यशस्वीरित्या कोणतीही इजा होवू न देता बाहेर काढली. ही पीन पोटात पूर्णतः गंजली होती. सध्या मुलीची प्रकृती ठणठणीत असून डॉ.नितीन जोशी यांचे मोरे कुटुंबियांनी आभार मानले आहे.

‘आपले पोट आपल्या हातात’ या पुस्तकाद्वारे सबंध महाराष्ट्रात पोहचलेल्या डॉ.नितीन जोशी यांनी गेल्या दोन वर्षात पोटविकारांवर वेगवेगळ्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यात लहान मुलांनी गिळलेल्या सेल, पेन्सिल आदी त्याचप्रमाणे पोट विकारासंदर्भात वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कुशलतेले केल्या आहेत.