सामाजिक वनीकरणाने खड्ड्यांसहीत झाडे खाल्ली, शिवसेनेचा रस्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

सामाजिक वनीकरण खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षसंगोपन व संवर्धनाच्या योजनेत मोठा गैरकारभार उघडकीस येत आहे. वनिकरण खात्याने खड्डे खोदून झाडे लावल्याचे दाखवत निधी हडप केला. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडमध्ये शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला.

सामाजिक वनिकरण खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष संगोपन व संवर्धनाच्या कामामध्ये मोठा गैरकारभार झाला आहे. या योजनेतील शासकीय निधी बोगस काम करून हडपण्याचे काम सामाजिक वनिकरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. वनीकरण खात्यातील धानापुणे, साबळे, स्वामी, काजी या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम संशयास्पद आहे. खंडेश्वरी ते पिंपळनेर, साक्षाळपिंप्री ते पारगाव, गवळवाडी ते हरीतटेकडी दरम्यान खड्डे खोदून झाडे लावल्याचे दाखवत निधी उचलण्यात आला. या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ७० कि.मी.कामाची चौकशी तासाभरात उरकली. एवढेच काय ग्राम पंचायतने केलेल्या कामाची बिले देखील सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी उचलले. एकंदरीत वनीकरण खात्यातील या गौडबंगालाच्या चौकशीसाठी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गावर माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी रस्ता रोको केला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. शिवसेनेच्या या रस्ता रोकोने राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.