मी डॉक्टर बोलतोय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमिता वारणकर, संजीवनी धुरी-जाधव । मुंबई

डॉक्टर… खऱया अर्थाने देवदूत. आपलं शरीराचं दुखणं… मनाचं दुखणं… हमखास बरं करणारे तज्ञ… पण आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने ‘डॉक्टर’ या शब्दाची व्याख्या फक्त एवढय़ापुरतीच मर्यादित आहे का? डॉक्टर म्हणजे दिलासा… मनाला उभारी… जीवनाची नवी उमेद… असह्य वेदनेतून हमखास सुटका… थोडक्यात, आरोग्याची वाट सुलभ करणारा एक अवलिया… उद्याच्या जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर डॉक्टर्स आज ‘फुलोरा’च्या व्यासपीठावर आले आहेत.

doctor-rekha-davarडॉ. रेखा डावर, स्त्रीरोगतज्ञ

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वास आणि सुसंवाद या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रुग्णाचा डॉक्टरांवर असलेला विश्वास त्याच्या उपचारासाठी फार महत्त्वाचा असतो.

अलिकडे महिलांमध्ये गर्भाशयाचा आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण काढले आहे. चाळीशीनंतर नियमित ‘पॅपस्मिअर’ आणि ‘सोनोग्राफी’ ही चाचणी केल्याने स्त्रियांना गर्भाशयाचा आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याआधीच या चाचणीद्वारे समजते. त्यातून मार्ग काढता येतो. पण आजही अनेक स्त्रिया त्यांचा हा आजार दुसऱया, तिसऱया आणि चौथ्या टप्प्याकर असताना येतात. त्यामुळे ही चाचणी दरवर्षी नियमित करणे गरजेचे असते.

‘फॅमिली मेडिसीन’

‘फॅमिली मेडिसीन’ हा तीन वर्षाचा कोर्स आहे,  तीन वर्षाची फॅमिली मेडिसीनची डीएनबी दिली जाते. फॅमिली डॉक्टरमध्ये आपण असे तज्ञ तयार करतोय.त्यात त्यांना मेडिसीन, पिडीएट्रिक, गायनॅक, सर्जरी हे चारही विषय शिककले जातात. त्यामुळे ते कुठल्याही विषयाचे प्राथमिक निदान आणि उपचार करू शकतात.

तिशीत लग्न आणि पस्तिशीपर्यंत पहिले मूल

आधी वीस ते तिशीत पहिले मूल झालेले बरे अशी मानसिकता होती. काळ बदललेला आहे. आता मुली नोकरी करतात, पुढचे शिक्षण घेतात. तरी सुद्धा आमचा आग्रह असतो की मूल पस्तिशीच्या आत झालेले बरे. जसं आईचे वय वाढते तसे बाळाला डाऊन सिंड्रोम, इतर व्यंग, तसेच आईचा रक्तदाब, हायपर टेन्शन होण्याची शक्यता असते.तीस पस्तिशीपर्यंत नक्कीच सगळे सेटल झालेले असतात. करीअर, प्रमोशन हे तर सुरूच राहणार; पण या वेळेत लग्न-मुलं झालेले योग्य असते.

doctor-vijay-ajgaonkarडॉ. विजय आजगावकर, मधुमेहतज्ञ

हल्ली डॉक्टरांची संख्या आणि रुग्णांची संख्या यामध्ये तफावत आहे. विशेषतः मोठय़ा हॉस्पिटलमध्ये हे घडतेय. त्यामुळे जेवढं लक्ष देता यावं तेवढं देता येत नसतं. याचा राग डॉक्टरांवर काढला जातो. आम्ही काहीही केलं तरी चालेल, पण डॉक्टरांनी आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे,  ही समाजाची वृत्ती बदलायला हवी. तसेच सध्याच्या घडीला वाईट ठरणारी अजून एक गोष्ट म्हणजे आता वैद्यकीय शिक्षण महाग होत चाललंय. मध्यमवर्गीय आणि साधारण परिस्थिती असलेले लोक शिक्षण घेऊ शकत नाहीत. वैद्यकीय fिशक्षणासाठी लक्षावधी रुपये लागतात आणि नंतर ते वसूल करायचे, अशी मानसिकता बदलायला हवी. यामुळे सेवाभाव कमी होऊन वैद्यकीय क्षेत्राचं नाव कमी होत चाललंय, असे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्टर म्हणून सांगावेसे वाटते.

संवाद हवा…

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये संवाद व्हायला हवा. त्यांनी एकमेकांशी जास्त बोलायला हवं, मात्र आता दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळ नसतो. प्रत्येकाला लवकर इलाज होऊन ताबडतोब बरे व्हायचे असते. त्यांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा विसंवाद वाढत चाललाय. आरोग्याच्या दृष्टीने तो जेवढय़ा लवकर कमी होईल तेवढं हे नातं वृद्धिंगत होईल.

  • फॅमिली डॉक्टरला कोणाला कशाची ऍलर्जी, आजार अशी त्या कुटुंबाची सगळी माहिती असते. असे असले तरी सध्या सगळ्यांची कन्सल्टंटकडे धाव वाढत आहे. ही आरोग्याच्या दृष्टिने चांगली बाब नाही.
  • मधुमेह झालेल्या मुलांना इन्सुलिन देण्याबरोबरच वजन कमी करणं, पौष्टिक आहार अशा उपायांनी तो नियंत्रणात राहू शकतो.
  • खाण्या-पिण्यावर नियंत्रण, नियमित रक्ततपासणी, इन्सुलिनची मात्रा या कृती आणि त्यांचं महत्त्व पालकांनी मुलांना शिकवावं.

doctor-harish-bhendeडॉ. हरीश भेंडे, अस्थिविकारतज्ञ

डॉक्टर रुग्ण हे विश्वासाचे नाते आहे आणि असायला हवे. कोणताही डॉक्टर हा रुग्णाला त्याच्या अनुभवाने उपचार करत असतो. संधिवात हा आजार आहे असे कोणी मानत नाही. मधुमेह, रक्तदाब हे आजार मानतात पण संधिवात ही अशी गोष्ट आहे की ती वयाप्रमाणे होणारच. सांधेदुखी ही बैठे काम, जंक फूड, कोल्ड्रिंक्स, टू व्हीलरमुळे गुडघ्यांवरती प्रचंड प्रेशर येतं. त्यामुळे पाठीचा, गुडघ्याला त्रास जाणवतो,  व्यायामाचा अभाव आणि पोषक आहाराची कमतरता यामुळे सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

मैदानी खेळामुळे आरोग्यदायी पिढी निर्माण होईल

शाळेपासून मुलांना खेळ शिकवायला हवेत.  मुलांना खेळायला मिळायला पाहिजे. शाळेपासून एक किंवा दोन तासिका मैदानात जाऊन खेळलेच पाहिजे. त्याने तंदुरुस्त राहता येते. मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे आणि मगच हेल्दी जनरेशन निर्माण होईल. पुस्तकातले किडे होऊन उपयोग नाही. खेळाच्या मैदानावरही जायला देत नाही,

ताणतणावासाठी योगा, मेडिटेशन करा

चाळिशीतल्या सित्रयांनी कॅल्शिअम-व्हिटॅमिनबाबत जागरूक असायला लागते. वजन नियंत्रणात आणावे लागते. डाएट, व्यायाम करणे, स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच मानसिक ताणतणाव हा कोणी देत नाही. तो आपण घेत असतो. आपण आलेल्या परिस्थितीवर कसा उपाय काढायचा हे आपल्यालाच माहीत असते. तणावाला सामोरे जा. खरं तर हे शाळा-कॉलेजांमध्ये शिकवायला हवे की ताणतणावाला सामोरे कसे जायचे. ताणतणावासाठी मानसोपचारतज्ञांकडे जातात, पण आपल्याकडे योगा, मेडिटेशन यांसारखी प्रभावी उपचारपद्धती आहे. हे तुम्हाला मदत करू शकतात. त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही.

doctor-vijay-surase डॉ. विजय सुरासे, हृदयविकारतज्ञ

बऱयाच वेळा कुटुंबांचं स्थलांतर होतं तसेच आई -वडील आणि मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यामुळे ‘फॅमिली डॉक्टर’ही संकल्पना मागे पडत चाललीय. हल्ली रुग्ण डॉक्टरांवर लवकर विश्वास ठेवत नाहीत. यासाठी डॉक्टर आणि रुग्णांच्या नात्यात पारदर्शकता असावी. रुग्णांवर कोणताही दबाव न आणता त्यांना स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य द्यावं. रुग्णांशी संवाद साधण्याची कला डॉक्टरांनी अवगत करावी.

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे साठीत होणारे आजार तिशीतच होऊ लागले आहेत. यासाठी शारीरिक श्रमाची कामं, व्यायाम, पालेभाज्या, ऋतुमानानुसार मिळणारी फळे खाणे, भाकरी असा आहार घ्यावा.

बाहेरचं खाण्यापेक्षा घरी तयार केलेले अन्नपदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे. ‘तंत्रशुद्ध आहार’ (बॅलन्स डाएट), व्यायाम आदींचा चोवीस तासांचा आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारा आराखडा, खाण्या-पिण्याचे नियम यांचे योग्य नियोजन करून त्यांचे नियमित पालन करायला हवे. यामुळे मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळता येऊ शकतात.

  •  चिवडा, चिप्स, वेफर्स यामध्ये मीठ आणि हायड्रोजेनिक फॅट खूप असल्यामुळे हे पदार्थ क्वचितच खावेत.
  •  ज्यांच्या कुटुंबात काही आनुवंशिक आजार आहेत त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये.

 रुग्ण आणि डॉक्टर नातं बदलतंय

डॉक्टर समाजाच्या दृष्टीने व्यावसायिक आणि रुग्ण हा ग्राहक होतोय.  ग्राहक आणि व्यावसायिकाचं नातं निर्माण होण्यासाठी देघेही कारणीभूत आहेत. डॉक्टरांवरचा विश्वास कमी होत चाललाय. ‘कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ’मुळे डॉक्टरही काळजी घेऊ लागले आहेत. यामुळे दोघांमध्ये दुरावा वाढत चाललाय. रुग्ण संशयी बनतोय. तो गुगलवर त्याच्या आजाराची माहिती शोधतो. त्यामुळे डॉक्टरांना भेटायला येताना काही रुग्णांना असं वाटतं की, आपण खूप अभ्यास केलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही अशा रुग्णांच्या बाबतीत दडपण येतं.