
सामना प्रतिनिधी। जळगाव
जळगाव – भुसावळ महामार्गावरील दूरदर्शन टॉवरसमोर उभ्या असलेल्या तीन प्रवासी बसवर उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून पडल्याने तीनही बस जळून खाक झाल्या आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जळगाव शहरात प्रवासी बसला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या बस दिवसभर शहराच्या बाहेर उभ्या करण्यात येतात. यातील बहुतेक बस दूरदर्शन टॉवरसमोरील प्रसन्न वॉशिंग सेंटरजवळ उभ्या केल्या जातात. रविवारी दुपारच्या सुमारास प्रसन्न यात्रा कंपनीच्या एम एच.०४. जी. ५४४६ आणि एमएच. ४३. एच.२०१ यासह जैन कंपनीची एक बस येथे उभी होती. त्याचवेळी दुपारी एकच्या सुमारास अचानक उच्चदाबाची विद्युत वाहिनी तूटली व जैन कंपनीच्या प्रवासी बसवर पडली. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गेली व बघता बघता शेजारीच उभ्या असलेल्या प्रसन्न यात्रा कंपनीच्या दोन्ही प्रवासी बसेसने पेट घेतला.
त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण केले. त्यानंतर मोठ्या शर्थीनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीमध्ये अभिजीत विलास देशपांडे यांच्या मालकीच्या प्रसन्न यात्रा कंपनीच्या दोन प्रवासी बस तर जैन कंपनीची एक बस जळून खाक झाली आहे. तिन्ही वाहनांचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीची पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली आहे.
























































