
सामना प्रतिनिधी । नारपूर
‘नाणार प्रकल्प रद्द करा’, ‘स्थानिकांना डावलून भाजप सरकारची दडपशाही सहन करणार नाही’, ‘नाणार होऊ देणार नाही’, ‘नाणार जाणारच’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसेना आमदारांनी विधिमंडळाचा परिसर सकाळी दणाणून सोडला. नाणार प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर कोकणवासीयांच्या प्रक्षोभाला भाजपला सामोरे जावे लागेल अशा इशारा यावेळी देण्यात आला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस मुसळधार पावसामुळे वाया गेला. दिवसभर कोणत्याही कामकाजाविना सभागृह तहतृकूब करावे लागले. विधानसभेचे सत्र सकाळी १० वाजता सुरू होणार होते, पण त्यापूर्वीच शिवसेनेचे आमदार विधिमंडळात हजर होते. शिवसेना आमदार व मुख्य प्रतोद सुनील प्रभू, किशोर दराडे, वैभव नाईक, राजन साळवी आदी आमदारांनी विधान भवनाच्या पायऱयांवर ठिय्या मांडला होता. ‘शिवसेना सदैव जनसामान्यांसोबत’, ‘नाणार रिफायनरी प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे’ असे फलक हातात घेऊन शिवसेना आमदारांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण परिसर शिवसेना आमदारांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी बोलताना आमदार सुनील प्रभू म्हणाले की, त्या भागातील स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली. आम्ही सरकारमध्ये असलो तरी नाणार प्रकल्पाला आमचा विरोध आहे. केंद्राने दबाव आणून हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर केवळ कोकणच्या जनतेतच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेतही प्रक्षोभ होईल. शिवसेना कोकणवासीयांसोबत आहे.
कोकणवासीयांच्या प्रक्षोभाला भाजप सरकारला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सरकारने सुज्ञपणा दाखवून नाणार प्रकल्प रद्द करावा. सरकारला हा इशारा आहे असे प्रभू म्हणाले. नाणारच्या संदर्भात शिवसेना योग्य वेळेस दोन्ही सभागृहांत भूमिका स्पष्टपणे मांडेल. नाणारला शिवसेना विरोध करेल. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने विधान भवनाच्या पायऱयांवर उभे राहून कोकणातील जनतेच्या भावना सरकारला सांगण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. सरकारने शहाणे व्हावे हा सरकारला इशारा आहे. या सभागृहात चर्चा झाली तरी नाणार होऊ देणार नाही. सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा यावेळी सुनील प्रभू यांनी दिला.






























































