
सामना प्रतिनिधी । ठाणे
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक असलेला आणि सध्या खुनाच्या कटात जेलची हवा खात असलेल्या नईम खान याच्या गोरेगावच्या बांगूर नगर येथील घरात एके ५६ रायफल, तीन मॅगझीन, दोन पिस्तुले आणि शंभरहून अधिक जिवंत काडतुसे असा शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोकेन ड्रग्ज तस्करीचा छडा लावत असताना ठाणे पोलिसांनी या शस्त्रात्रांचा छडा लावला. या प्रकरणी नईमची पत्नी यास्मीनला अटक करण्यात आली आहे. या रायफलसह हा सर्व शस्त्रांसाठा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आणून तो लपवून ठेवण्यात आल्याची कबुली यास्मिनने दिल्याने मुंबईवर पुन्हा मोठा रक्तपात करण्याचा कट होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी कोकेनसह जाहिद कश्मिरी व संजय बिपीन या दोघा आरोपींनाअटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली. याबाबतची माहिती देण्यासाठी आज ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतून एके ५६ रायफलसह शस्त्रसाठा जप्त केल्याचे सांगितले. अमली पदार्थ तस्करीच्या तपासादरम्यान कश्मिरीने कोकेनचा साठा गोरेगाव येथे राहणाऱया यास्मिन खान हिच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी यास्मिनच्या घरावर छापा मारला. यावेळी तिच्या घरात अमली पदार्थांचा साठा सापडलाच, पण सोबत एके ५६ रायफल, तीन मॅगझीन, ९५ जिवंत काडतुसे, ९ एमएमचे दोन पिस्तूल व त्याची १३ काडतुसे ही शस्त्र सापडली. ही शस्त्र कोठून आणली याची चौकशी करत असताना यास्मिन ही नईम खान याची बायको असल्याचे समोर आले.
नईम खान दाऊदचा कुख्यात शूटर
नईम खान हा कुख्यात डॉन दाऊदच्या गॅगमधला शूटर असून २०१६ मध्ये छोटा शकीलच्या सांगण्यावरून त्याने इक्बाल अत्तरवाला याला मारण्याचा कट रचला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक करून पाच बंदुका जप्त केल्या होत्या. सध्या तो ठाणे कारागृहात असून चौकशीसाठी ठाणे पोलीस त्याला लवकरच ताब्यात घेणार आहे.
ती रायफल १९९३ ची
नईम खानच्या घरात सापडलेली एके ५६ रायफल १९९३ सालच्या मुंबई ब्लास्टच्या वेळी आणण्यात आली होती. ती रायफल ज्या वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून ठेवण्यात आली होती ते १९९७ सालचे वर्तमानपत्र होते. त्यामुळे आता या रायफलचा संबंध थेट दहशतवादाशी लावता येणार नसला तरी त्या दिशेने तपास करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.























































