ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा हृदय विकाराने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे, पंढरपूर

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व हिराचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू झाला. गेल्या आठ वर्षांपासून न चुकता वारी करणारा हिरा पंढरीची वारी अर्ध्यावर सोडून गेल्याने पालखी सोहळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हिरा हा अश्व गेली आठ वर्षे चालत होता. मृत्यूसमयी त्याचे वय तेरा वर्षाचे होते. पालखी प्रस्थान दिवशी तो श्रीमंत शितोळे सरकार यांच्या बेळगाव जिल्ह्यातील अंकली या गावावरून माऊलीच्या सेवेत तो दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पुणे या ३० किलोमीटरच्या वाटचालीत माऊलीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली. काल (शनिवारी) रात्री माऊलीचा सोहळा पुण्यात दाखल झाला. आज रविवारी सकाळी ७ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. हिराच्या रिक्त जागी आता राजा नावाचा नवीन अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे.

माऊलीच्या रिंगण सोहळ्यात हिराची धाव म्हणजे वायूवेगाची असायची. साक्षात ज्ञानेश्वर माऊली या अश्वावर आरूढ होतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. त्यामुळे भाविक रिगण सोहळ्यानंतर हिराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात अनेक भाविक हिराच्या टापा खालची माती उचलून आपल्या माथ्याला लावत असत.