कुडाळ आगाराचे वेळापत्रक विस्कळीत प्रवाशांची गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

कुडाळ एस.टी.आगाराने नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी केली. मात्र हे नवीन वेळापत्रकच विस्कळीत झाल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गाड्याच वेळेत नसल्याने एस.टी.चा प्रवासी खाजगी वाहतूकीकडे वळत आहे. यामुळे एस.टी.प्रशासनाला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

कुडाळ एस.टी.आगाराने १ जुलै पासून नवीन सुधारित वेळापत्रक (पावसाळी) अंमलात आणले. पण हे वेळापत्रक जारी झाल्यापासून बहुतांशी गाड्या उशिराने धावत आहेत. तर काही फे-या अचानक रद्द होत आहेत. नवीन वेळापत्रकात ब-याच गाड्यांची वेळ उशिरा तर काहींची वेळ लवकर करण्यात आली आहे. काही मार्गावर नव्याने फे-या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र मुळातच नवीन वेळापत्रक प्रवाशांच्या पूर्णतः गैरसोयीचे असल्याने प्रवाशांमधून एस.टी.च्या कारभाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या आगाराच्या पूर्वी ४२२ फे-या होत्या त्यात वाढ करून ४७२ फे-या करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तुलनेने गाड्यांची मोठी कमरता या आगाराला भासत आहे. चालक – वाहक पुरेसे आहेत मात्र गाड्यांच्या कमरतेबाबत प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. बहुदा काही फे-या रद्द करण्यात येतात. याचाही फटका प्रवाशांना बसत आहे. तसेच नवीन वेळापत्रक एस.टी. कर्मचा-यांनाही त्रासदायक ठरत आहे. प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या नवीन वेळापत्रकाबाबत कुडाळ पं.स.च्या ४ जुलैच्या मासिक सभेत सदस्यांनी जुनेच वेळापत्रक पूर्ववत करून प्रवाशांची गैरसोय तात्काळ दूर करण्याची मागणी केली. त्यावर एस.टी.प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट तालुक्यातील एस.टी. सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना वेळेत गाडीच उपलब्ध होत नसल्याने एस.टी.चा प्रवाशी खाजगी वाहनांचा आधार घेत असून यात मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ब-याच फे-या एकाच मार्गावर समांतर धावतात, काही उशिराने तर काही रद्दही होतात. अशा प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एस.टी.चा प्रवाशीवर्ग एस.टी.पासून दूर होऊ लागल्यानेच एस.टी. महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. कुडाळ एस.टी. आगारालाही नवीन वेळापत्रकामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

वाढत्या तिकीट दरवाढीचाही मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या दरवाढीनंतर एस.टी.ने पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली. मात्र नवीन वेळापत्रकही कोलमडले. त्यामुळे प्रवाशांमधून तीध्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कुडाळ आगाराने पूर्वीचेच वेळापत्रक पूर्ववत करून प्रवाशांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

दरम्यान, याप्रकरणी कुडाळ आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता एस.टी.ने पावसाळी वेळापत्रक सुरू केले आहे. प्रवाशांच्या गैरसोयीचीही दखल घेण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ देणार नसून चांगली सेवा दिली जाईल असे त्यांनी सांगितले.