
सामना ऑनलाईन | लंडन
दहा महिन्यांपूर्वी माझी पत्नी सेरेना विलियम्स मुलीला जन्म दिल्यावर मृत्यूशी झुंजत होती. तीच सेरेना टेनिसकोर्टवर पुनरागमन करीत विम्बल्डनची फायनल खेळली. खरेच ती सुपरमॉम आहे. तिच्या धैर्याला सलाम करावाच लागेल, अशा शब्दांत सेरेनाचा पती आणि रेडिट वेबसाईटचा संस्थापक अलेक्सिस ओहानियन याने सेरेनाचा कौतुक केले आहे. प्रसूतीनंतर सेरेनावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी खरे तर तिच्या जीवावरच बेतले होते, पण मोठ्या धीराने तिने या संकटावर मत करीत आम्हाला दिलासा दिला असेही अलेक्सिस म्हणाला.
सेरेना शनिवारी आपल्या आठव्या विम्बल्डन जेतेपदापासून वंचित राहिली. तिला अंतिम फेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरकडून ६-३ , ६-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ओहानियनने इंस्टाग्रामवर टाकलेला मेसेज अतिशय भावनिक आहे. तो म्हणतो ‘ऑलीम्पियाला जन्म दिल्यानंतर झालेल्या शत्रक्रियेआधी मी सेरेनाचे चुंबन घेतले. कारण आम्हाला ठाऊक नव्हते की ती ऑपेरेशननंतर पुन्हा उठेल का?. सर्वशक्तिमान परमेश्वरालाही सेरेनाच्या धैर्याला दाद द्यावीशी वाटली आणि ती सुखरूप आमच्यात परतली. एवढेच नव्हे तर तिच्या परमप्रिय टेनिसकोर्टवर परतत तिने आपल्या खेळाचा जलवाही क्रीडा जगताला दाखवला.”























































