
सामना ऑनलाईन, मुंबई
आमच्या हद्दीत पाणी साचणार नाही, साचले तर त्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे असा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) दावा मुसळधार पावसाने फोल ठरवला. एमएमआरडीएच्या अखत्यारित येणार्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर चालू महिन्यात दहा दिवसांत ३५० खड्डे पडले. या महामार्गावर प्रत्येक किलोमीटरवर १९ खड्डे आढळले. त्यात पाणी साचून डबकी झाली होती. त्यामुळे महामार्गावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीने मुंबईकर अक्षरशः हैराण झाले.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी ते दहिसरदरम्यानचा १८ किलोमीटरचा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारित येतो. त्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. चालू जुलै महिन्यातील पावसात या पट्ट्यात ३५० खड्डे पडले. त्यातील ३०५ खड्डे बुजवल्याचा दावा एमएमआरडीएने केला असून उर्वरित खड्डे थोडी उघडीप झाल्यानंतर बुजवले जातील असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
मुंबईत पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यात पेव्हर ब्लॉकचा अडथळा येतो म्हणून त्यांचा वापर बंद केला गेला. एमएमआरडीएने मात्र महामार्गावरचे खड्डे बुजवण्यास पेव्हर ब्लॉकचाच वापर केल्याचे दिसून येते. पाऊस होत असताना सिमेंट किंवा डांबराचा वापर खड्डे बुजवण्यासाठी केला जाऊ शकत नसल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पेव्हर ब्लॉक वापरले गेल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.































































