संडासात मोबाईल पडला, काढताना हात अडकला ; तरुणाची बोंबाबोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

संडासात पडलेला मोबाईल काढण्याच्या नादात एका तरुणाचा हात संडासाच्या भोकात अडकला. त्याचा हात सोडवण्यासाठी अखेर अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. रोहित राजभर असं या तरुणाचं नाव असून तो काही दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. एक हात अडकलेला असताना रोहितने दुसऱ्या हाताने संडासाचा दरवाजा उघडल्याने त्याची अवस्था घरच्यांना कळली आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी धावपळ करायला सुरुवात केली.

रोहित हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी आहे. रोहित हा विनोबा भावे नगरातील गौरी शंकर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या त्याच्या काकांकडे रहायला आला होता. सोमवारी तो मोबाईल घेऊनच संडासात गेला होता. त्याच्या हातातून मोबाईल निसटला आणि भोकात गेला. तो बाहेर काढण्याच्या नादात असताना रोहितच्या हातातील कडं या भोकात अडकलं, ज्यामुळे त्याला हात बाहेर काढता येत नव्हता. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाचा हात संडासाचं भांडं फोडून मोकळा केला. रोहितला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आलं. एक्सरेमध्ये त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालं नसल्याचं कळलं आहे. हा सगळा प्रकार झाल्यानंतरही रोहितला १४ हजारांचा मोबाईल गेल्याचं दु:ख सतावत आहे.