
सामना प्रतिनिधी। तुळजापूर
तुळजापूर बसस्थानक परिसर वेश्यांचा अड्डा बनला आहे. यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी हैराण झाले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यामुळे या बसस्थानकांवर कायम प्रवाशांची गर्दी असते. शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थाही या बसस्थानकातून बस पकडतात. पण काही महिन्यांपासून दिवसाढवळ्या या परिसरात शरीरविक्री करणाऱ्या महिलांचा वावर वाढला आहे. यामुळे बसस्थानकावर येणाऱ्या महिला व तरुणींना येथे उभे राहणे कठिण झाले आहे. मंदिराचे पुजारी विजयकुमार पेंदे यांनी नुकतीच ही बाब पत्रकारांच्या निदर्शनात आणून दिली.
दरम्यान, येथील बसस्थानकात पोलीस चौकी आहे. मात्र गेल्या सहा महिन्यापासून स्थानकात पोलीस पहारा नसल्याने वेश्या व्यवसाय फोफावला आहे, पोलीसांनी कारवाई न केल्याने व कर्तव्य न बजावल्याने तुळजापूरातील बसस्थानकासारखे अत्यंत मोक्याचे ठिकाण वेश्या व्यवसायाचा अड्डा बनले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. यामुळे स्थानकात पुरुष व महिला पोलीस तात्काळ तैनात करावेत. अशी मागणी स्थानिक करत आहेत.
बस स्थानक नियंत्रक कुमार हंगरगेकर यांनीही याबाबत आमच्या मर्यादा असल्याचे सांगून हा प्रकार तात्काळ थांबला पाहिजे असे म्हटले आहे.





























































