
सामना प्रतिनिधी । मालवण
१ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. त्याआधी शासनाने बंदी घातलेल्या एलईडी लाईट मासेमारी बोटी जप्त करून कठोर कारवाई करावी. ड्रोन कॅमेराद्वारे अवैध मासेमारीवर नजर ठेवण्यात यावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक व अन्य शिवसेना आमदारांनी केली आहे.
एल.ई.डी. द्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीवर कठोर कारवाई करत पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा. सागरी अंमलबजावणी कक्ष निर्माण व्हावा. या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना आमदारांनी नागपूर विधान भवनच्या पायर्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी आमदार वैभव नाईक, अशोक पाटील, प्रकाश फातर्पेकर, अमित घोडा, शांताराम मोरे. आदी उपस्थित होते.
“एल.ई.डी. मच्छीमारी बंद झालीच पाहिजे”, “पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे”, सागरी अंमलबजावणी कक्ष निर्माण झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन शिवसेना आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले. कोकण किनारपट्टीवर राजरोसपणे एल.ई.डी लाईट मासेमारी सुरु असून पारंपरिक मच्छिमार हवालदिल झाला आहे. एल.ई.डी. मासेमारी बंदीचा शासन निर्णय होऊनही कोकणात त्याची अंमलबाजवणी होत नसल्याचे चित्र आहे.
कोकण किनारपट्टीवर एल.ई.डी. मच्छीमारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मोठमोठ्या बोटीत २५ ते ३० एल.ई .डी लाईटच्या प्रखर प्रकाशाच्या साहाय्याने माश्यांच्या डोळयावर परिणाम करून मच्छीमारी केली जात आहे. कर्नाटक, गोवा, केरळ व गुजरात या ठिकाणच्या मोठमोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. यामुळॆ पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. हि मच्छीमारी अशीच सुरु राहिल्यास भविष्यात समुद्रातील मासे नष्ट होणार असून पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मच्छीमार उध्वस्त होणार आहे. यामुळे एल.ई.डी. मच्छीमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा हि आमची भूमिका असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
































































