अखेर पीक विमाप्रश्नी तोडगा निघाला, सर्व मागण्या मान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पीक विमा प्रश्नावर रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकार यांना नमते घेण्यास भाग पाडले आहे. डॉ राहुल पाटील यांनी केलेले शिष्टाई सफल झाली असून याप्रश्नी चुक झाल्याचे मान्य करत रिलायन्स पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी महसुलमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

नागपूर येथील विधानभवनात परभणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार आणि नेत्यांच्या उपस्थितीत पीक विमा प्रश्नी गेल्या १८ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात झालेल्या विशेष महत्वपूर्ण बैठकीत रिलायंन्स कंपनीच्या अन्यायाविरुद्ध यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने यामध्ये त्वरीत हस्तक्षेप करुन तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात गत आठवड्यात आमदार डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्याची विनंती केली होती. त्यानुसार पीक विमा प्रश्नी सर्व मागण्या मान्य करत नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे.

या बैठकीस कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेश वरपुडकर, आमदार विप्लव बाजोरिया, विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, कृषी विभागाचे मुख्य सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त एस.पी. सिंह, कॉ. राजन क्षीरसागर, विलास बाबर, डॉ. सुभाष कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, श्रीनिवास जोगदंड, सुभाष जावळे, रवींद्र पतंगे, गणेशराव रोकडे, भाऊसाहेब गिराम, विठ्ठलराव दुधाटे, उद्धवराव काळे, माधवराव दुधाटे, बबनाव ढगे, शिवाजी दुधाटे, विश्वांभर गोरजे आणि विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.