
सामना ऑनलाईन । मिआमी
मिआमीमधील एका फॅशन शोमध्ये एका मॉडेलने तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत रॅम्प वॉक केला आहे. मारा मार्टीन असे त्या मॉ़डेलचे नाव असून तिने तिच्या चार महिन्याच्या मुलीला घेऊन मिआमी स्वीम विक २०१८ च्या रॅम्पवर वॉक केला आहे. तिच्या या धाडसा वरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींनी माराचे कौतुक केले तर काहींनी तिला मुलाची काळजी नसल्याचे सांगत निष्काळजी आईचा ठपका देखील ठेवलाय. माराच्या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.
मिआमीमध्ये सध्या स्वीमवेअरचा फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये मॉडेल्स वेगवेगळ्या ब्रॅण्डसच्या बिकीनी, मोनोकिनी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंगचे कपडे घालून रॅम्पवॉक करतात. ही एक स्पर्धा असून यात सर्वात सुंदर स्विमवेअर असलेल्या कंपनीला व मॉडेलला विजयी घोषित केले जाते. या स्पर्धेत मारा पहिल्या १२ जणींमध्ये निवडली गेली होती. अंतिम फेरित माराने सोनेरी रंगाची वन शोल्डर बिकीनी घातली होती. मात्र रॅम्पवर येण्याआधी तीने आपल्या बाळाला छातीशी कवटाळून स्तनपान करायला सुरुवात केली व तशीच ती रॅम्पवर देखील गेली. तिला रॅम्पवर स्तनपान करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले मात्र नंतर लोकांनी तिच्या या धाडसाचे कौतुक केले. मारा जरी ही स्पर्धा जिंकली नसली तरी तिच्या या रॅम्पवॉकने तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. माराने याआधी देखील एका स्पर्धेत तिच्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन रॅम्पवॉक केला होता.























































