इंग्लंड दौऱ्यानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकतील निर्णायक तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने हिंदुस्थानचा ८ विकेट्सने पराभव करत मालिकेवर २-१ असा कब्जा केला. या मालिकेमध्ये हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि महेंद्रसिंह धोनीच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे्. इंग्लंड दौऱ्यानंतर धोनी निवृत्त घेणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर धोनीने केलेल्या एका कृतीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यासह मालिका गमावल्यानंतर धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सामना संपल्यानंतर पंचाशी बोलता बोलता त्यांच्या हातातून चेंडू घेताना दिसत आहे. धोनीने यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात धोनीने सामना संपल्यानंतर पंचांच्या हातातून चेंडू घेतला होता. इंग्लंडविरुद्ध एक दिवसीय मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतरत्याने याच प्रकारची कृती केल्याने सोशल मीडियावर धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परंतु धोनीकडून अद्याप याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

नक्की काय आहे प्रकरण?
धोनीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. आपल्या शेवटचा सामना त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला होता. हा सामना ड्रॉ राहिला होता. सामना संपल्यानंतर धोनी आपल्यासोबत स्टम्प घेऊन गेला होता आणि आता इंग्लंडविरुद्ध तो आपल्यासोबत चेंडू घेऊन गेल्याने त्याच्या निवृत्तीच्या अफवा पसरत आहेत.

इंग्लंडविरुद्ध धोनीची कासवछाप फलंदाजी
इंग्लंडविरुद्ध धोनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. या मालिकेत धोनीने केलेल्या कासवछाप फलंदाजीमुळे त्याच्यावर टीका केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यात फलंदाजी करताना धोनीने ७९ धावा केल्या. यात ४२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात त्याने ५९ चेंडूत ३७ केल्या. सलग चार चेंडू निर्धाव गेल्यानंतर त्याच्याविरोधात मैदानात प्रेक्षकांनी हुटिंग सुरू केली होती. या सामन्यात हिंदुस्थानचा पराभव झाला. सामना संपल्यानंतर कर्णधार कोहली आणि गावसकरने धोनीच्या या खेळीचा बचाव केला होता.