लेख : अडथळय़ांची शर्यत आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी<<

[email protected]

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटिशांच्या जागतिक सत्तेला उतरती कळा लागली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता त्या इंग्लंडमध्ये (हवामानामुळे) तो क्वचितच उगवू लागला. काळ बदलला, जागतिक सत्ताकेंद्र अमेरिका आणि रशिया यांच्यात विभागले गेले. सर्वच क्षेत्रांत या दोन देशांची स्पर्धा, चढाओढ आणि शीतयुद्धही (कोल्ड वॉर) सुरू झाले. एकेकाळी संपन्न असलेल्या ब्रिटनला आता अवकाशात माणूस पाठवणे वगैरे झेपणारे नव्हते. त्यामुळे हिंदुस्थानचा अंतराळवीर राकेश शर्मा १९८४ मध्ये रशियन यानातून अंतराळात जाऊन आला तरी इंग्लंडला ती गोष्ट साध्य झाली नव्हती.

अखेर रशियाच्या ‘मीर’ या अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या अंतराळयात्रींमध्ये एका ब्रिटिश अंतराळयात्रीची निवड झाली. ती होती हेलन शर्मन.

शेफिल्ड येथे १९६३ मध्ये जन्मलेल्या हेलनने तिथेच १९८४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९८४ मध्ये तिने लंडन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. नंतर जीईसी कंपनीसाठी तिने संशोधक आणि तंत्रज्ञ म्हणून काम केले. त्यानंतर चॉकलेटच्या स्वादासंदर्भात केमिस्ट म्हणूनही काही काळ नोकरी केली. याच काळात एकदा बीबीसी रेडिओवरून हेलनने ‘ब्रिटिश अंतराळयात्री हवे आहेत’ अशी जाहिरात ऐकली आणि १९८९ मध्ये सुमारे १३ हजार उमेदवारांमधून तिची निवड झाली. ‘प्रोजेक्ट ज्युनो’साठी तिने काम करावे असे ठरले. रशियाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवायचा होता. त्यासाठी हेलनला रशियन भाषा शिकणे गरजेचे होते.

हेलनच्या वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच तिची नवीन भाषा चटकन शिकण्याची क्षमता हीसुद्धा तिच्या निवडीमधली महत्त्वाची गोष्ट ठरली. ज्युनो प्रकल्पासाठी हेलनने ‘स्टार सिटी’मध्ये तब्बल १८ महिन्यांचे अंतराळयात्रींसाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि कुठेतरी माशी शिंकली! ‘ज्युनो’ प्रकल्पासाठी आवश्यक तितका पैसा जमा झाला नाही. शेवटी ‘हो’ ‘ना’ करता करता आणि आंतरराष्ट्रीय संबंध अबाधित राहावेत म्हणून त्यावेळच्या सोव्हिएत सरकारने आवश्यक तेवढा पैसा उपलब्ध करून दिला; परंतु मूळ प्रकल्पात जे वैज्ञानिक प्रयोग करायचे ठरले होते त्यात काटछाट करण्यात आली. ठरलेला प्लॅन फिसकटल्यामुळे हेलन नर्व्हस झाली असणार… पण इलाज नव्हता.

शेवटी ‘सोयुझ’ या रशियन यानातून रशियाच्या ‘मीर’ या अंतराळ स्थानकावर पाठविण्याच्या पथकात हेलनची वर्णी लागली. ऍनातोली आर्तसेबर्स्की आणि सर्जी क्रिकालेव यांच्यासह १८ मे १९९१ रोजी हेलन शर्मनने अंतराळात उड्डाण केले. ती पहिली ब्रिटिश अंतराळवीर ठरली.

‘मीर’ अंतराळ स्थानकावरच्या वैज्ञानिक प्रयोगांमध्ये हेलनच्या वाटय़ाला वैद्यकीय आणि शेतकीविषयक प्रयोग निरीक्षणे आली होती. याशिवाय अंतराळातून ब्रिटिश बेटांचे फोटो घेणे, ब्रिटनमधल्या शालेय मुलांशी संवाद साधणे अशा अनेक जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या.

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी हेलनला आठ दिवसांची अंतराळ सफर करता आली. आतापर्यंत अंतराळात विहार केलेल्या ५५६ जणांपैकी तरुण अंतराळयात्रींमध्ये तिचा सहावा क्रमांक लागतो. ज्युनो प्रकल्पात तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला ‘शेफिल्ड वॉक ऑफ फेम’चा ‘स्टार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

नंतरच्या काळात आपल्या अंतराळ प्रवासाचा आणि ‘मीर’वरील कामगिरीचा उपयोग तिने जनसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केला. १९९७ मध्ये तिने मुलांसाठी ‘द स्पेस प्लेस’ नावाचं पुस्तक लिहिलं आणि रेडिओ व टीव्हीवर कार्यक्रम सादर केले. तिला ब्रिटिश विज्ञान संस्थेचे मानद सदस्यत्व मिळाले आणि ‘हॉलियॉक्स’ या टीव्ही कार्यक्रमात तिने स्वतःचीच (हेलनची) भूमिका केली.