
सामना प्रतिनिधी । पिंपरी
ज्याच्याशी लग्न ठरले होते, त्यानेच तरुणीची पर्स पळवून साडेतेरा हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी आरोपी मनोज मदन इंगळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी फेटाळला.
या प्रकरणी माधुरी अर्जुन जाधव (२१, रा. कुंभेफळ, ता. जि. संभाजीनगर) हिने फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी मनोज मदन इंगळे (३३, रा. जुना जालना) याच्याशी फिर्यादीचे लग्न ठरले होते व ते एकमेकांना फोनवर बोलत होते व भेटतही होते. दरम्यान, आरोपीचे दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरल्याचे कळाल्यावर फिर्यादीने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला शेकटा येथे बोलावले. त्यावेळी आरोपीने तिच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचवेळी आरोपीने तिला उद आणण्यास सांगितले आणि तेवढ्यात आरोपीने तिची पर्स पळविली.
पर्समध्ये मोबाईल व साडेचार हजार रुपये रोख असा १३,५०० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यावरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. त्या अर्जावरील सुनावणीवेळी आरोपीकडून ऐवज जप्त करणे बाकी असून तपासासाठी आरोपीच्या अटकेची गरज असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.




























































