अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
आरोपी सुर्यकांत चव्हाण

सामना प्रतिनिधी । खेड

तालुक्यातील सुकीवली चव्हाणवाडी येथील नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने तालुका हादरुन गेला आहे. लैंगिक हवस भागल्यानंतर तीचा खुन करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकणाऱ्या नराधमाच्या खेड पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी हा लैगिंक अत्याचाराची बळी ठरलेल्या मुलीचा काका असल्याने काका पुतणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला आहे.

तालुक्यातील सुकीवली चव्हाणवाडी येथे राहणारी श्रृती चव्हाण ही भरणे नाका येथील नवभारत हायस्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत होती. काल सायंकाळी शाळा सुटल्यावर रिक्षा पकडून ती नेहमीप्रमाणे घरी जायला निघाली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालकांने तिला सुकीवली चव्हाणवाडी स्टॉपवर सोडल्यावर ती घरी चालत जात असताना तीच्याच मागावर असलेल्या त्याच वाडीतील सुर्यकांत नवनाथ चव्हाण (२०)  या हैवानाने तिच्यावर झडप घातली. तीने आरडाओरडा करु नये म्हणून तीचे तोंड दाबून तिला स्वतःच्या घरात ओढून नेले. या ठिकाणी तीच्यावर त्याने पाशवी बलात्कार करुन आपली लैंगिक हवस भागवली.

आपण केलेले कृष्णकृत्य बाहेर पडू नये म्हणून त्या नराधमाने तीचा गळा आवळून खून केला आणि तीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. थंड डोक्याने प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर सुर्यकांत हा पळून जाण्यासाठी खेड  एसटी स्थानकावर आला.

काळोख पडायला आला तरी शाळेत गेलेले श्रृती घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र ती कुठेच आढळून न आल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी खेड पोलीस स्थानकात येऊन श्रृती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी संशयित आरोपी म्हणून सुर्यकांत चव्हाण याच्यासह अन्य काहीजणांची नावे दिली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून खेडचे पोलीस निरिक्षक अनिल गंभीर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे व खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.टी.नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरवात केली.

पोलिसांनी तात्काळ सुकीवली चव्हाणवाडी येथे जावून सुर्यकांत याच्या घराची तपासणी केली असता त्यांना त्या ठिकाणी मुलीचा हेअरबँड तसेच भाताच्या कणगीत लपवून ठेवलेली तीची सँडल मिळाली. घरातील एका पत्र्याच्या ट्रंकची झडती घेतली असता त्या टँकमध्ये श्रुतीचे दप्तरही आढळून आले. या तीन्ही वस्तू श्रुतीच्या वडिलांनी ओळखल्याने या प्रकरणात सुर्यकांत याचाच हात असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले.

या घृणास्पद प्रकरणातील आरोपी पळून जावू नये म्हणून खेड पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानक, भरणे नाका व खेड एसटी स्थानक येथे सापळा रचला. साध्या गणवेशातील पोलीस तपास करत असताना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास संशयित सुर्यकांत हा खेड एसटी स्थानकावर फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या ठिकाणी त्याची कसून चौकशी केली असता सुरवातीला त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याची पोलीस खाक्यात चौकशी सुरु करताच त्यांने आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी त्याला पहाटे सुकीवली चव्हाणवाडी येथे नेल्यावर त्याने तीचा मृतदेह ज्या शौचालयाच्या टाकीत टाकला होता ती टाकी दाखवली. पोलिसांनी पंचाच्या समक्ष टाकीचे झाकण उघडल्यानंतर टाकीत श्रुतीचा मृतदेह आढळून आला. टाकीतून मृतदेह बाहेर काढताच तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही आपले अश्रू आवरता आले नाही.