मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दुधाला पाच रुपयांची दरवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी रात्री आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेला मुंबईचा दूध पुरवठा आज सुरळीत झाला आहे. गोकुळ, अमूल, महानंदसह सर्व दूध डेअऱ्यांना पुरेसे दूध उपलब्ध झाल्याने मुंबईकरांचे दुधाचे टेन्शन संपले आहे.

मुंबईत दररोज समारे ६० लाख लिटर दुधाचे वितरण होते. त्यापैकी अमूल, महानंद, गोकुळ, वारणा, प्रभात, कृष्णा, आरे या प्रमुख डेअऱ्यांकडून ४० लाख लिटर तर मुंबई परिसरातील तबेल्यांकडून १० लाख लिटर दुधाचे वितरण केले जाते. मात्र शेतकऱ्यांनी मुंबईचा दूध पुरवठा रोखल्याने मुंबईत दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने मुंबईकरांची दोन दिवस दुधासाठी तारांबळ  उडाली होती. मात्र शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेताच गुरुवारी रात्री आणि आज दिवसभर मोठ्या प्रमाणात दुधाचे टँकर आले आहेत. त्यामळे अमूल, गोकुळसह सर्व डेऱ्यांकडे आज सुमारे ५० लाख लिटर एवढे मुबलक दूध उपलब्ध झाले आहे.

दुधाचा अंगणवाड्या आणि माध्यान्न भोजनात समावेश
देशात सध्या दुधाचे विक्रमी उत्पादन होत आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशांतर्गत दुधाची मागणी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार कर्नाटक, बिहार आणि राजस्थानमध्ये आयसीडीएस योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये व मध्यान्न भोजन योजनेमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप सुरू केले आहे. दुधाच्या भुकटीवर असलेला आयातभार ३० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ निर्यातीवर असलेला इन्सेन्टिव्ह २० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. राज्य सहकारी संघाला खेळत्या भांडवलापोटी स्वस्त कर्ज देण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा कॉर्पस निधी उभारला आहे.