
सामना ऑनलाईन, कोलंबो
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ९ बळी घेत तब्बल ६१ वर्षांपूर्वीचा आपल्या देशाचा विक्रम मोडीत काढला आहे. केशवने ४१.१ षटकात १२९ धावा देत विक्रमी कामगिरी केली. या दमदार गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा पहिला डाव ३३८ धावांमध्ये संपुष्टात आला.
६१ वर्षांनंतर विक्रम
कसोटी सामन्याच्या एका डावात ९ बळी घेणारा केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज आहे. या आधी १९५७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ह्यूज टॅफील्डने इंग्लंड विरूद्ध ११३ धावांमध्ये ९ गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे तेव्हा कसोटी क्रिकेट मध्ये अष्टकचा (एका अष्टकात ८ चेंडू ) चा जमाना होता.
मात्र या विक्रमाने दिली हुलकावणी
कसोटी सामन्याच्या एका डावात सर्केत्कृष्ट कामगिरीचा विक्रम श्रीलंकेच्या रंगना हेरथने २०१४ मध्ये याच मैदानावर १२७ धावा देत ९ बळी घेतले होते. मात्र केशव महाराजला ९ बळी घेताना २ धावा अधिक मोजाव्या लागल्या.
द. आफ्रिकेकडून परदेशी भूमीवरील सर्वोत्तम कामगिरी
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची परदेशी भूमीवरील ही सर्वोत्तम कामगिरी असून यापूर्वी जलदगती गोलंदाज लान्स क्लूजनरने १९९६ मध्ये कोलकाता येथे हिंदुस्थान विरूद्ध ६४ धावांमध्ये ८ बळी घेतले होते.



























































