
सामना ऑनलाईन । श्रीनगर
दक्षिण कश्मीरमधील पोलीस कॉन्स्टेबल सलीम शाह यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. कुलगाम जिल्ह्यातील मुतालहामा येथून शाह यांचे त्यांच्या घरातून दहशतवाद्यांनी काल नाटय़मयरीत्या अपहरण केले. यानंतर आज शनिवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह कुलगामजवळ मिळाला. शाह हे सुट्टीवर आलेले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते.
यापूर्वी दहशतवाद्यांनी जवान औरंगजेब आणि जावेद दार यांचेही अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. सध्या कश्मीर खोऱ्यात पोलीस आणि लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ऑल आऊट मोहीम हाती घेतलेली आहे. यामुळे सैरभैर झालेले दहशतवादी जवानांना लक्ष्य करू लागले आहेत. गेल्या एक महिन्यात सुरक्षा दलाच्या जवानांची अपहरण करून हत्या होण्याची ही तिसरी घटना आहे.




























































