
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार आणि माफीचा साक्षीदार बनलेला पाकिस्तानी – अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर शिकागो येथील तुरुंगात हल्ला झाला आहे. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या हेडलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती खालावल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सोमवारी दिले.
हेडली याच्यावर तुरुंगातील दोन कैद्यांनी ८ जुलै रोजी हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. हल्ला करणारे दोन्ही कैदी हे सख्खे भाऊ असून त्यांना १० वर्षांपूर्वी एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हेडलीवर त्यांनी हल्ला नेमका कोणत्या कारणावरून केला हे अद्यापि समजू शकलेले नाही. मुंबईत २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यातील आरोपी हेडली पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांसाठी ‘डबल एजंट’ म्हणून काम करीत होता.


























































