मराठा आरक्षण आंदोलनाचे उत्तर महाराष्ट्रात पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सटाणा

मराठा समाजाने गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात आरक्षणासाठी तब्बल ५८ मोर्चे काढूनदेखील शासनाने दखल घेतली नाही. किंबहुना आरक्षणासाठी राज्यातला पहिला बळी काकासाहेब शिंदे यांच्या रूपाने गेल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सटाणा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको करण्यात येऊन आंदोलनस्थळी बागलाण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी मोर्चात डॉ. प्रशांत सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, लालचंद सोनवणे, काकाजी सोनवणे, पंकज सोनवणे, रमणलाल छाजेड, नितीन सोनवणे, अब्दुल बोहरी, राजू जगताप, दीपक सोनवणे, दीपक रौंदळ, जगदीश मुंडावरे, संदीप खैरणार, सागर सोनवणे, आनंदा लाडे आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

नांदगावातही शुकशुकाट
मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला साथ देत नांदगाव शहरातही बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, एसटी बसेस बंद असल्याने सगळीकडे शुकशुकाट जाणवला. दरम्यान, आज सकाळी ११ वाजता शिवस्फूर्ती मैदान येथून सकल मराठा समाजाने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मोर्चाची सांगता दरम्यान राजेंद्र देशमुख, समाधान पाटील, महेंद्र गायकवाड, विशाल वडघुले यांची भाषणे झाली. या वेळी तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार संजय पवार, अॅड. अनिल आहेर, चंद्रशेखर कवडे, अशोक पवार, भगवान पाटील, महेंद्र जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान,  बोलठाण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करून बंद ठेवून निवेदन देण्यात आले.