
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
मराठा आरक्षणाच्या निर्णयाला शासनाकडून होत असलेला उशीर आणि काका साहेब शिंदे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ उरण मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी उरण शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी उरण तहसीलदार कल्पना गोडे यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
उरण येथील गणपती चौक येथून मोर्चास सुरवात झाली. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण मिळाले पाहिजे’. ‘आमच्या मागण्या मान्य व्हायलाच पाहिजेत’ अशा घोषणा देत हा मोर्चा राजपाल नाका, गांधी चौक पुढे तहसिल कार्यालयात नेण्यात आला. तेथे सभा घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांना निवेदन देण्यांत आले. या प्रसंगी नायब तहसीलदार दिपाली पुरारकर या उपस्थित होते.
या निवेदनात असे नमूद केले आहे की , मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास राज्य सरकार उशीर करीत आहे. या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात संभाजीनगर जिल्हयातील गंगाखेड येथे सुरु असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाचा नाहक बळी गेला त्यांचा निषेध करीत आरक्षणाचा निर्णय शासनाने लवकरात – लवकर घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी संतोष पवार, अशोक चव्हाण, विवेक देशमुख, निशा शेलार, साक्षी सुहास गवस, सिद्धी राजेशिर्के, संगिता सचिन ढेरे, ज्योस्त्ना येरूनकर, कल्याणी दुखंडे, सागर पवार, अनिल पवार, दिनकर गुंजाळ, दत्ता नीलवर्ण, रवींद्र सावंत, प्राची माने, सरीता देशमुख,महेश राऊत आदी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.






























































