
सामना ऑनलाईन, सांगली
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शुक्रवारचा सांगली दौरा रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री सांगली महानगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्यात पाय ठेवू द्यायचा नाही , असा ठराव मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला होता. या ठरावामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी म्हणजेच २७ जुलैऐवजी मुख्यमंत्री ३० जुलै रोजी सांगली जिल्ह्यात प्रचार सभा घेण्यात असल्याचं कळतंय. शुक्रवारी वाळवा तालुक्यातील आष्टा इथल्या अतिरिक्त तहसील कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होतं. इथे तहसील कार्यालय व्हावं अशी इथल्या जनतेची आणि लोकप्रतिनिधींची बऱ्याच वर्षांपासून मागणी होती. या कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत होणार आहे.



























































