नाशिक, धुळे, जळगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे ठिकठिकाणी रास्ता रोको तर जोगेश्वरी व ठाण्यात रेल रोको करण्यात आला. कळंबोलीसह काही ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या. नाशिकमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक शहर व जिह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. मागणी पूर्ण व्हावी यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केले, मोर्चे काढले. धुळय़ातही जीतेंद्र जांभळे या क्यक्तीने आंदोलन सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळय़ाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी आमदारांच्या पुतळय़ांचे दहन करत आंदोलन केले. मनमाड, चांदवड, देवळा, येवला, मालेगाव, सटाणा येथून एकही एसटी बस धावली नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय झाली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. आज बुधवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाशिक शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, दहीपूल, शालिमार, शिवाजी रोड, महात्मा गांधी रस्ता, रविवार कारंजा, गंगापूर रोड, कॉलेज रोड या भागातील व्यवहार पूर्णपणे बंद होते. सिडको, सातपूर, पंचवटी, पाथर्डी फाटा, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, भगूर, आडगाव, आनंदवली, पंडित कॉलनी, कॅनडा कॉर्नर आदी सर्वच भागात व्यवसाय बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट येथे रास्ता रोको करीत मराठा आरक्षणाची मागणी करीत कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या ठिकाणी वाहतूक सुरळीत झाली.

विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी

बंदमुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये उपस्थिती कमी होती. यामुळे दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली होती. शालेय वाहतूक करणाऱया वाहनधारकांनीही बंदला पाठिंबा दिला होता.

एसटीची वाहतूक बंद

बंदमुळे शहर व जिह्यात ठिकठिकाणी बस आगारांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. प्रवासी नसल्याने अनेक बसस्थानकांवर शुकशुकाट होता. काही बसस्थानकांवर मात्र बस सुटण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी बसून होते.

अत्यावश्यक सेवा सुरू

दवाखाने, मेडिकल दुकाने यासह शहर व जिह्यातील अत्यावश्यक सेवा दिवसभर सुरू होत्या. शासकीय कार्यालयेही सुरूच होती.

ग्रामीण भागात प्रतिसाद

निफाड, देवळा, सायखेडा, ओझर, सिन्नर, घोटी, वणी, मालेगाव, नांदगाव, पिंपळगाव-बसवंत, चांदवड, इगतपुरी, हरसूल, नांदूरशिंगोटे, येवला, अंदरसूल, निफाड, वडनेरभैरव, मालेगाव, सटाणा, ब्राह्मणगाव अशा जिह्यातील सर्वच ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वत्र व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मराठा आरक्षण त्वरित देण्याचे निवेदन पोलिसांना सादर केले. भगूर, सिन्नर, खाणगाव चौफुली आदी भागांत कार्यकर्ते रस्त्यावर आले होते.

गंगापूर धरणावर आंदोलन

गंगापूर धरण परिसरातही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जलसमाधी देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर येथील आंदोलन थांबले.