पोलीस नाईकला सहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी 

अटक टाळण्यासाठी आणि कोठडीत ठेवू नये, यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना गुहागर येथील पोलीस नाईकला रंगेहाथ पकडले. रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. लाच घेणाऱ्या पोलिस नाईकचे नाव सुरेश गोरे असे आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुहागर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक गोरे यांच्याकडे एक तक्रार आली होती. यामध्ये एका तरूणाने दुचाकीचा हॉर्न वाजवत तरूणीचा पाठलाग केल्याची तक्रार होती. याप्रकरणात अटक टाळण्यासाठी पोलिस नाईक गोरे यांनी दहा हजार रूपयांची लाच मागितली. यानंतर संबंधिताने ही माहिती रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. गोरेंनी सुरवातीला दहा हजाराची मागणी केली होती. अखेर नऊ हजारांवर तोडगा काढण्यात आला. त्यातील सहा हजारांचा पहिला हप्‍ता देण्याचे ठरले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, पहिला सहा हजारांचा हप्‍ता देण्यासाठी सुरेश गोरे यांना पोलिस ठाण्याजवळील गणेश मंदिराजवळ सहा हजार रूपये देण्यात आले. याच ठिकाणी गोरेला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.