
सामना ऑनलाईन । मुंबई
डिझेल दरवाढ, टोलचे धोरण यासह विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवस सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केंद्र सरकारशी झालेल्या वाटाघाटीनंतर अखेर मागे घेण्यात आला आहे. या संपामुळे मालवाहतूक व उद्योग क्षेत्राचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) हा संप पुकारला होता. संघटनेच्या मागण्यांसदर्भात शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग खात्याशी झालेल्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यात झालेली वाढ, टोल गोळा करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान, अवजड-व्यावसायिक चालक-सहकर्मचार्यांना सरकारच्या विमा योजनेंतर्गत सामील करणे, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे कवच देणे, फिटनेस सर्टिफिकेटचा कालावधी एक वर्षावरून दोन वर्षे करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करू सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

























































