
सामना प्रतिनिधी । पुणे
माझ्या जीवनात महर्षी विनोद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन व्यक्ती आल्या. यांच्यामुळे माझ्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझे जीवन घडले, अशी भावना राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.
महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन आणि महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळातर्फे ७५व्या व्यासपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी रावते बोलत होते. योगी डॉ. संप्रसाद विनोद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, योगसंशोधक डॉ. एम. जे. भोळे, पत्रकार रामभाऊ जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
रावते म्हणाले, न्यायरत्न विनोद यांनी दिलेल्या गुरुबळामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आम्ही उभे राहू शकतो. न्यायरत्न विनोद हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. समर्पित जीवन जगलो की आयुष्यात सारे काही मिळते, हा न्यायरत्न विनोद यांनीच दिलेला संस्कार आहे.
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, खरा गुरू हा तुम्हाला स्वतंत्र करतो. अज्ञानाचे निराकरण ही मूलभूत आणि सातत्यपूर्ण चालणारी गोष्ट आहे. हे ज्याला समजते तो गुरू कधीही अभिनिवेश आणून जगत नाही. महर्षी विनोदांना झालेले ज्ञान हे ‘बोधात्मक ज्ञान’ होते. त्या आत्मस्पर्शामुळे व्यावहारिक जीवन व आध्यात्मिक जीवन यांचा खूप चांगला समतोल त्यांनी साधला होता. त्यामुळे आपणही प्रभावित न होता सतत डोळस राहून शोध घेण्याची भूमिका असली पाहिजे.

































































