
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
कांद्याची निर्यात करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील एका कांदा व्यापाऱ्याला तब्बल ९७ लाख रुपयांचा गंडा देशातील तसेच परदेशातील काही व्यापाऱ्यांनी घातला आहे. या प्रकरणात फसवले गेलेले व्यापारी संजय पाराजी वांढेकर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे.
तालुक्यातील मोहोज बुद्रुक कांदा व्यापारी वांढेकर यांचा कांदा खरेदी व विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी १ जाने. ते १२ जाने. १८ या काळात त्यांच्याकडे असलेला कांदा बापू एस्मोशिरस रा. चेन्नई, श्रीलंका येथील व्यापारी शशीकरण नागराज कोलबस, राहुल एल.बी.इ. ट्रान्सपोर्ट मुंबई व तामिळनाडू राज्यातील अरुणाचलन उन्नीकोरिन यांना विकला होता. या विकलेल्या मालाचे काही पैसे या व्यापाऱ्यांनी वांढेकर यांना दिले मात्र ९६ लाख ८० हजार २३८ रुपये वारंवार मागूनही न दिल्याने आपण फसवले गेलो असल्याचे वांढेकर यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी या सर्व व्यापाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला असून जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी हा गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आहे. एखाद्या व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांना फसवण्याचा प्रकार तालुक्यात पहिल्यांदाच घडला आहे.































































