पालिकेच्या विद्यार्थ्यांना ‘केंब्रिज’चे धडे! गणित, इंग्रजी, विज्ञान, फायनान्स ऑलिम्पियाडसाठी अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आता जगद्विख्यात केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांसाठी  शिक्षण मिळणार आहे. यामध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान आणि फायनान्स ऑलिम्पियाडसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आठ माध्यमाच्या शाळा चालवण्यात येतात. पालिका शाळांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. शेकडो शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणखी वाढावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करणे शक्य होणार आहे. शिवाय बाहेरील स्पर्धेत टिकण्यासाठी पालिकेचे विद्यार्थी तयार होणार आहेत.

या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणार

  • प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (पीआयएसए)
  • प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिट्रसी स्टडी (पीआयआरएलएस)
  • ट्रेंडस् इन इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ऍण्ड सायन्स स्टडी
  • आंतरराष्ट्रीय फायनान्स ऑलिम्पियाड परीक्षा-आठवी व नववीकरिता
  • इंटरनॅशनल फायनान्स ऑलिम्पियाड
  • प्रज्ञा शोध परीक्षा

या बाबींसाठी हवीय मंजुरी

या उपक्रमासाठी सोमवारी होणार्‍या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना  ऑलिम्पियाडसाठी शिक्षक-मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणे, ऑलिम्पियाडच्या धर्तीवर निवडक मुलांसाठी वर्ग सुरू करणे, केंब्रिज विद्यापीठाच्या ऑलिम्पियाड व इतर बाह्य परीक्षांना बसण्याची फी भरणे, तिसरीपासून प्रज्ञा शोध परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रम, आवश्यकतेनुसार पुस्तके खरेदी व त्यांचे वाटप करण्यासाठी शिक्षण समितीची मंजुरी घेण्यात येईल.

‘इडुको’कडून इंग्रजी संभाषण कौशल्य

मातृभाषेचा अभिमान राखून इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळवणे सध्या अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे पालिकेचे विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावेत यासाठी शाळांमधून गणित, विज्ञान विषय इंग्रजीमधून शिकवले जात आहेत. यासाठी पालिका शाळांतील शिक्षकांना संभाषणात्मक इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ‘इडुको’ (Educo) या संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाईल.