नियत साफ नसलेले लोक उद्योगपतींना पडद्याआड भेटतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-tension

सामना ऑनलाईन । लखनौ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे ‘चौकीदार’ नसून घोटाळेबाज उद्योगपतींचे ‘भागीदार’ आहेत, हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेला वार मोदी यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यावरून त्यांनी काँग्रेसवर दुसऱ्यांदा आज लखनऊ येथे तोफ डागली. ‘ज्या लोकांची नियत साफ नसते ते उद्योगपतींना पडद्याआड भेटतात’ असा पलटवार मोदी यांनी केला.

मोदी यांच्या हस्ते लखनऊ येथे ६० हजार कोटींच्या ८१ प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. उद्योगपतींसोबत फोटो काढायला घाबरणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत. मात्र त्यांचे उद्योगपतींसोबत फोटो नसले तरी त्यांच्या घरी दंडवत न घातलेला उद्योगपती सापडणार नाही, असे सांगून मोदी म्हणाले की, आज इथे उपस्थित असलेले अमरसिंह हे काँग्रेस आणि उद्योगपतींच्या संबंधांचा सारा इतिहास सांगू शकतील.

आपली नियत आणि इरादे साफ असतील तर कोणासोबतही उभे राहण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची भीती वाटायचे काहीच कारण नसते, असे मोदी म्हणाले. महात्मा गांधीजींचे जीवन इतके पवित्र होते की, ते बिर्ला यांच्यासोबत उभे राहताना संकोचत नव्हते. बिर्ला यांच्या घरी ते मुक्कामही करायचे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

देश घडवण्यात शेतकरी, कारागीर, मजूर, कर्मचारी यांची जशी भूमिका असते तशीच उद्योगपतींचीही असते. आम्ही उद्योगपतींना चोर, लुटारू बोललो, त्यांना अपमानित केले तर कसे चालेल? मात्र जो कोणी चुकीचे काही करेल, त्याला देश सोडून पळावे लागेल किंवा तुरुंगात जावे लागेल.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान