
सामना ऑनलाईन । ठाणे
ठाण्यामधील खोपट एसटी बस स्थानकाजवळ सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. नौपाड्याहून उड्डाणपुलावरुन खोपट येथे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यावर पार्क केलेल्या २ कार, १ दुचाकी आणि जवळच असलेल्या महावितरणच्या डीपी बॉक्सला जोरदार धडक दिली. सदर कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येतेय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. पहाटेची वेळ असल्याने नागरिकांची आणि वाहनचालकांची या रस्त्यावर जास्त प्रमाणात गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असुन ठाणे पोलीस वाहनचालकाचा शोध घेत आहेत. दरम्यान या वाहनचालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अपघातात नुकसान झालेल्या स्थानिक वाहनचालकांनी केली आहे.























































