
पत्नीने आणलेल्या हुंड्याने समााधान झाले नाही म्हणून बिहारमधील गिरीडीहमध्ये पतीने महिलेला सोडून दुसरे लग्न केले. त्यानंतर त्या महिलेच्या मागे दुर्दैवाचा फेरा लागला. नवरा सोडून गेल्यानंतरही तिच्या सासऱ्याने तिला माहेरी पाठवले नाही. सासरी राबवून घेत तिचा छळ सुरूच होता. या काळात सासऱ्यानेच सुनेवर अनेकदा बलात्कार केला. पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून महिला गिरीडीह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. तिचा सासरा सरकारी कर्मचारी असल्याने पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष करत तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे ती दरियापूरमध्ये विधवा आजीकडे राहू लागली. मात्र, दुर्दैवाने अजूनही तिची पाठ सोडली नव्हती. तिच्या सासऱ्याने तिचा अश्लील व्हिडीओ बनवला होता आणि तो तिला ब्लॅकमेल करत होता. तो तिच्या आजीकडे आला. त्याने महिलेला सासरी पाठवण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावर तिला धमकावत मारहाणही करण्यात आली.
महिलेचा आईचा मृत्यू झाल्याने तिचे वडील घर सोडून दुसऱ्या महिलेसह राहत होते. नवऱ्याने सोडले होते, सासऱ्याने बलात्कार केला, पोलीस तक्रार घेत नाहीत, वडिलांचा आधार नाही अशा परिस्थितीत महिलेने न्यायालयात धाव घेतली. आरोपींनी कठोर शिक्षा करण्याची मागणी तिने केली आहे. न्यायालयाने दखल घेतल्यानंतर विशेष पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
























































