
सामना ऑनलाईन । अंबरनाथ
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अंबरनाथमध्ये पाण्यासाठी महिलांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगरमधील महिलांनी येथील जलकुंभावर चढून हे आंदोलन केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवगंगा नगरमधे अपुरा पाणीपुरवठा होत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्यानचा आरोप या महिलांनी केला आहे.
जवळपास २५ ते ३० महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून प्राधिकरणाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतलं.



























































