भावसिंगपुऱ्यातील नागरिकांचा डंपिंग ग्राऊंडला विरोध, रस्त्यावर ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरातील कचरा भावसिंगपुऱ्यात नको, अशी भूमिका घेत परिसरातील महिला व नागरिकांनी रविवारी राजधानीनगरात रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीत कचऱ्याची वाहने परत पाठवली होती. मनपा प्रशासनाने कचरा टाकण्यास अडथळा आणणाऱ्या महिला व नागरिकांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सोमवारी रास्ता रोको करीत कचरा टाकण्यास विरोध केला. पोलिसांनी ४० ते ५० जणांना ताब्यात घेतल्याने तणावाचे वातावरण झाले असून भावसिंगपुऱ्यातील नागरिकांचे रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज सोमवारी छावणी पोलिसांनी पडेगाव परिसरातून ८० जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले.

भावसिंगपुरा व परिसरातील नागरिक मनपाच्या कत्तलखान्यातील दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच मनपा प्रशासनाने या ठिकाणी कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भावसिंगपुऱ्यातील नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मनपाची कचरा वाहतूक करणारी वाहने परत पाठवली म्हणून नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मनपाने आज सोमवारी पुन्हा भावसिंगपुऱ्यात कचऱ्याची वाहने नेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले. भावसिंगपुऱ्यातील ७० ते ८० नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांना पाहताच पोलिसांनी मनपाच्या वाहनांना संरक्षण दिले. परंतु, नागरिकांनी थेट रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. तेव्हा ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती भावसिंंगपुऱ्यातील नागरिकांना कळताच संपूर्ण गावकऱ्यांनी राजधानीनगराकडे धाव घेतली. मनपा व पोलीस पथकाला तीव्र विरोध करून कचरा टाकणे बंद करा, अशा घोषणा देत संपूर्ण गावाला अटक करण्याची मागणी केली होती.

रस्त्यावरच भजन, हरिपाठ, महाआरती
भावसिंगपुऱ्यातील नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच संपूर्ण गावकरी रस्त्यावर उतरले असून रस्त्यावरच भजन, हरिपाठ, महाआरती करीत मनपा व पोलीस प्रशासनाचा निषेध केला. रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे रस्त्यावर आंदोलन सुरू होते. या ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, पोलीस निरीक्षक सतीश टाक, श्रीकांत परोपकारी, विवेक सराफ, साबळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत नागरिकांना सोडणार नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा निर्धार गावकऱ्यांनी केला.