सार्वजनिक बांधकाम कार्यालयास काँग्रेसचे ‘टाळे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करत मालवण तालुका काँग्रेसने मंगळवारी टाळे ठोकले. यावेळी बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.

मालवण तालुक्यातील नादुरुस्त कोळंब पुलाच्या रखडलेल्या दुरुस्ती कामासाठी मालवण काँग्रेसने भीक मांगो आंदोलनातून गोळा केलेली रक्कम काँग्रेसचे पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यासाठी गेले. यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी हजर नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. पूर्व कल्पना देऊनही अधिकारी बराच वेळ न आल्याने अखेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.

दरम्यान कार्यालयात उशिरा दाखल झालेले बांधकामचे अधिकारी पी.डी. पाटील यांना काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांनी जाब विचारत कोळंब पुल दुरुस्ती काम, रस्त्यांवरील खड्डे आदी समस्यांबाबत फैलावर घेऊन प्रश्नांचा भडिमार केला. तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे वेळीच न बुजविल्यास कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू, असा इशारा यावेळी अंधारी यांनी दिला. तर भीक मांगो आंदोलनातून जमलेली रक्कम कर्मचाऱ्यांकडेच सुपूर्द केली. यावेळी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांच्यासह तालुका सरचिटणीस अरविंद मोंडकर, महेश लुडबे, संदेश कोयंडे, लीलाधर कवटकर उपस्थित होते.