राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांना शरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर हे अखेर पोलिसांनापुढे शरण आले आहेत. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी मानकरांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले होते, मात्र अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना पोलिसांना शरण येण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष मानकर यांच्याकडे काम करीत होता. २ जूनला त्याने  घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. यामुळे पोलिसांनी भोळे याच्यासह एकूण ६ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये कुख्यात गुंड नाना कुदळेचाही समावेश आहे. दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी यांनी न्यायालयात अटकपूर्वी जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन खंडपीठापुढे हा अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र तीनही खंडपीठांनी त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथेही त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही.